ताज्या घडामोडीपुणे / पीसीएमसीसामाजिक

“मी हजारो अनाथांची माय झाले, तुम्ही गणगोत व्हा…” — माईंच्या लेकी व जावयांचा अनोखा सन्मान!


“मी हजारो अनाथांची माय झाले, तुम्ही गणगोत व्हा…” — माईंच्या लेकी व जावयांचा अनोखा सन्मान!

वंदे भारत न्यूज एक्सप्रेस | कुंभारवळण, पुरंदर

पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांनी आयुष्यभर हजारो अनाथ मुलांना आईची माया दिली. “मी हजारो अनाथांची माय झाले, तुम्ही गणगोत व्हा…” हा त्यांचा संदेश आजही समाजाला माणुसकीची प्रेरणा देत आहे. याच भावनेतून ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण येथे रविवार, ७ जून २०२६ रोजी “अधिक मास सोहळा – माईंच्या लेकी व जावयांचा सन्मान” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेत अधिक मासाला विशेष महत्त्व आहे. या पवित्र पर्वाचे औचित्य साधत माईंच्या कुटुंबातील लेकी आणि जावयांचा सन्मान करून कुटुंबसंस्कृती, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.

 

या सोहळ्यात माईंच्या आश्रयाखाली वाढलेल्या लेकींना आणि त्यांच्या जावयांना पारंपरिक पद्धतीने पोशाख, साडी-चोळी, जोडवे, ताम्हण, निरांजन, ३३ अनारसे आणि तुळशीचे रोप अशा भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर उपस्थित मान्यवर आणि पाहुण्यांसाठी पारंपरिक पुरणपोळीच्या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन माईंचे प्रथम मानसपुत्र आणि ममता बाल सदनचे अध्यक्ष श्री. दीपक (दादा) गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या प्रसंगी ममता बाल निकेतन संस्थेच्या अध्यक्षा ममताताई सपकाळ, जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अरुणभाऊ सपकाळ, द मदर ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष विनय सपकाळ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

माईंच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या लेकी-जावयांना सन्मानित करण्याचा हा उपक्रम केवळ एक धार्मिक सोहळा नसून, माणुसकी, कृतज्ञता आणि कुटुंब मूल्यांचे जतन करणारा प्रेरणादायी उत्सव ठरणार आहे.

“आपली उपस्थिती ही आमच्यासाठी प्रेरणा आणि या लेकींसाठी आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा अनमोल आशीर्वाद ठरेल.” अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.

 

– वंदे भारत न्यूज एक्सप्रेस


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *