अबॅकस इंटर्नल परीक्षेत चमकले सिद्धार्थ एज्युकेशनचे विद्यार्थी; गुणवंतांचा मेडल देऊन गौरव
अबॅकस इंटर्नल परीक्षेत चमकले सिद्धार्थ एज्युकेशनचे विद्यार्थी; गुणवंतांचा मेडल देऊन गौरव
रुपीनगर (पुणे) : रुपीनगर येथील सिद्धार्थ फाउंडेशन व एज्युकेशन ट्रस्ट, पुणे संचलित सिद्धार्थ कोचिंग अकॅडमी व अबॅकस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या Abacus Internal Exam 2025-26 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा मेडल देऊन सन्मान सोहळा रविवारी उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शहर उपाध्यक्ष औदुंबर पाडुळे, स्वराज्य इंटरप्रायझेसचे संचालक गणेश इधाटे तसेच इंद्रायणी इन्फोटेकचे संचालक अभिजित देवकते उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडल प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
लहान वयातच लाखोंच्या पटीतील गणिते काही सेकंदांत सोडविण्याची विद्यार्थ्यांची क्षमता पाहून उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी बोलताना पत्रकार औदुंबर पाडुळे यांनी, “एवढ्या लहान वयात विद्यार्थ्यांची गणिती पकड विलक्षण आहे. हे यश संस्थापक जयवंत लादे सर व शिक्षकवृंदांच्या परिश्रमांचे फलित आहे,” असे गौरवोद्गार काढले.
उद्योजक गणेश इधाटे यांनीही ट्रस्टच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि कष्ट करण्याची तयारी निर्माण करणे हेच सिद्धार्थ एज्युकेशन ट्रस्टचे वैशिष्ट्य आहे.”
कार्यक्रमात तीनही मान्यवरांच्या हस्ते संस्थापक व आदर्श शिक्षक जयवंत लादे यांचा उल्लेखनीय शिक्षणसेवेबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे विध्यार्थी व पालकांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.





