गुन्हेगारीताज्या घडामोडीपुणे / पीसीएमसी

पुण्यात धक्कादायक प्रकार! प्राचार्याला ब्लॅकमेल करून ७ लाखांची खंडणी; PSIसह तिघांवर गुन्हा


पुण्यात धक्कादायक प्रकार! प्राचार्याला ब्लॅकमेल करून ७ लाखांची खंडणी; PSIसह तिघांवर गुन्हा

पुणे : शिक्षण क्षेत्रातील एका प्राचार्याला पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवत तब्बल ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पातळीवरून तातडीने कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, कर्मचारी सुदाम तायडे आणि ‘दामिनी पथका’तील रील स्टार म्हणून ओळखली जाणारी सोनाली हिंगे यांचा समावेश आहे. तिघांविरोधात बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित प्राचार्यांना प्रोटेकशन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सऊल ऑफन्सस ऍक्ट (पॉक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची धमकी देण्यात आली. या भीतीचा गैरफायदा घेत आरोपींनी ७ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.

घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने दखल घेत कारवाईचे आदेश दिले. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, ‘दामिनी पथका’तील कर्मचाऱ्याचे नाव समोर आल्याने प्रकरण अधिक गंभीर मानले जात आहे.

उपनिरीक्षक बडे सध्या सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती आहे, तर हिंगे ही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असल्याचे समजते. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *