गुन्हेगारीताज्या घडामोडीपुणे / पीसीएमसी

फुगेवाडीत मृत्यूचे तांडव! उरुळी कांचन कनेक्शन  उरुळी कांचनमध्ये तयार झाली ‘मृत्यूची दारू’; मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे पोलिसांच्या ताब्यात


फुगेवाडीत मृत्यूचे तांडव! उरुळी कांचन कनेक्शन 

उरुळी कांचनमध्ये तयार झाली ‘मृत्यूची दारू’; मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे पोलिसांच्या ताब्यात

विषारी बनावट दारूमुळे १२ बळी; २१५ लीटर मिथेनॉल मिसळल्याचा धक्कादायक खुलासा

वंदे भारत न्यूज एक्सप्रेस | पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात गेल्या ४८ तासांत झालेल्या गूढ मृत्यूंचे अखेर धक्कादायक सत्य समोर आले आहे. फुगेवाडीतील आठ जणांसह पुणे शहरात एकूण १२ जणांचा मृत्यू हा विषारी बनावट दारूमुळे झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. उरुळी कांचन येथे तयार करण्यात आलेल्या गावठी दारूमध्ये तब्बल २१५ लीटर घातक मिथेनॉल मिसळण्यात आल्याने ही दारू अक्षरशः मृत्यूचे विष ठरली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नोंदीवरील सराईत गुन्हेगार योगेश वानखेडे याने ही केमिकलयुक्त बनावट दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध बेकायदेशीर अड्ड्यांवर पुरवल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून संपूर्ण रॅकेटचा तपास वेगाने सुरू आहे.

उरुळी कांचनमध्ये तयार झाले ‘मृत्यूचे विष’

मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन परिसरात अत्यंत बेकायदेशीर पद्धतीने गावठी दारू तयार करण्यात आली होती. दारूची तीव्रता वाढवण्यासाठी त्यात मिथेनॉलसारखे घातक रसायन मिसळण्यात आले. ही दारू पिल्यानंतर नागरिकांना अचानक उलट्या, डोळ्यांवर परिणाम, श्वास घेण्यास त्रास आणि गंभीर विषबाधा होऊ लागली. काही तासांतच अनेकांचा मृत्यू झाला.

फुगेवाडीत भीतीचे वातावरण

फुगेवाडीत सलग होत असलेल्या मृत्यूंमुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला मृत्यूचे नेमके कारण समोर येत नव्हते. मात्र, वैद्यकीय तपासणीत मृतांच्या शरीरात मद्य आणि मिथेनॉलचे अंश आढळल्यानंतर संपूर्ण प्रकार उघड झाला.

फुगेवाडी आणि परिसरात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून, आणखी चौघे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

हडपसरमध्येही चार बळी

या विषारी दारू प्रकरणात हडपसर परिसरातील चार जणांचाही मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख पुढीलप्रमाणे:

राहुल शरद क्षीरसागर (वय ४५)

विजय भूकुरलाल शर्मा (वय ४५)

अरुण डाडर

अशोक रमेश चव्हाण

मोठी जीवितहानी टळली

मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने शहरातील अनेक भागांत हा विषारी दारूचा साठा वितरित केल्याचे समोर आले आहे. मात्र, पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाने वेळीच कारवाई करत मोठा साठा जप्त केला. त्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांच्या ताब्यात मुख्य सूत्रधार

या प्रकरणानंतर पोलिसांनी योगेश वानखेडे याला तात्काळ ताब्यात घेतले आहे. मिथेनॉलचा पुरवठा कुठून झाला? या काळ्या बाजारामागे आणखी कोणते नेटवर्क कार्यरत आहे? याचा सखोल तपास सुरू असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *