पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राज्यात प्रथम; ‘माझी वसुंधरा’ अभियानात अव्वल
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राज्यात प्रथम; ‘माझी वसुंधरा’ अभियानात अव्वल
पिंपरी : राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा ५.०’ अभियानात दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या गटात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महापालिकेला दहा कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
पर्यावरण संवर्धन, हरित उपक्रम, कचरा व्यवस्थापन, जलसंधारण, ऊर्जा बचत आणि जनजागृती या क्षेत्रांत प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल महापालिकेच्या कामाची दखल घेण्यात आली. अभियान कालावधीत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे डेस्कटॉप मूल्यांकन तसेच फील्ड मूल्यांकन करण्यात आले. या दोन्ही टप्प्यांतील गुणांच्या आधारे राज्यातील १४ गटांमधील विजेत्यांची निवड करण्यात आली.
महापालिकेच्या हद्दीत वृक्षारोपण व संगोपन, प्लास्टिक निर्मूलन मोहिमा, जलसंधारण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन सुधारणा, हरित शाळा उपक्रम, सौरऊर्जा प्रकल्प आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून विविध पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आले. नागरिक, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक आस्थापनांच्या सहभागामुळे या अभियानाला व्यापक यश मिळाले.
महापौर रवी लांडे यांनी सांगितले की, “माझी वसुंधरा ५.० अभियानात मिळालेला प्रथम क्रमांक हा सर्व विभागांच्या समन्वित कामकाजाचा आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा परिणाम आहे. पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाला प्राधान्य देत पुढील काळात अधिक परिणामकारक प्रकल्प राबविण्यात येतील.”
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही समाधान व्यक्त करत, “या यशामुळे शहराचे पर्यावरण संवर्धन अधिक बळकट होईल. आगामी काळात तंत्रज्ञानाधारित उपाययोजना व नाविन्यपूर्ण प्रकल्पांना अधिक गती देण्यात येईल,” असे सांगितले.
राज्यातील पर्यावरणपूरक उपक्रमांच्या अंमलबजावणीत पिंपरी-चिंचवड शहराने दाखविलेल्या नेतृत्वामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली असून, या यशामुळे पुढील विकास उपक्रमांना नवे बळ मिळणार आहे.





