गुन्हेगारीताज्या घडामोडीपुणे / पीसीएमसी

देहूरोडमध्ये भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या; रमेश रेड्डीवर ९ राऊंड फायरिंग


देहूरोडमध्ये भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या; रमेश रेड्डीवर ९ राऊंड फायरिंग

मावळ तालुक्यात खळबळ; राजकीय वर्तुळात संताप, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची नाकाबंदी

(वंदे भारत न्यूज एक्सप्रेस):

मावळ: तालुक्यातील देहू रोड परिसरात सोमवारी रात्री धक्कादायक गोळीबाराची घटना घडली असून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते रमेश रेड्डी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश रेड्डी यांच्यावर रात्रीच्या सुमारास अचानक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर तब्बल ९ राऊंड गोळीबार केला. यामध्ये डोक्यात गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आणि जागीच कोसळले.

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने देहू रोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथे हलविण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि समर्थकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. काही काळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत नागरिकांना शांत केले.

दरम्यान, या घटनेनंतर देहू रोड बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू असून हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *