जळगावताज्या घडामोडी

ॲड. अनिकेत उज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कायदेविषयक शिबिर


ॲड. अनिकेत उज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कायदेविषयक शिबिर

न्याय विश्वास फाउंडेशनच्या कायदेविषयक शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५० हून अधिक नागरिकांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन

वंदे भारत न्यूज एक्सप्रेस नेटवर्क

जळगाव | प्रतिनिधी

न्याय विश्वास फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी (दि. २६) पार पडलेल्या या शिबिरात २५० हून अधिक नागरिकांनी विविध कायदेशीर विषयांवर तज्ज्ञ वकिलांकडून मार्गदर्शन घेतले.

सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत आयोजित शिबिरामध्ये जमीन व मालमत्ताविषयक वाद, ७/१२ उतारा, मालमत्तेचे हक्क, कौटुंबिक व फौजदारी प्रकरणे, पती-पत्नीमधील वाद, पोलिस तक्रार, एफआयआर नोंदणी प्रक्रिया, सायबर गुन्हे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक तसेच महिला, बालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर हक्कांबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांच्या वैयक्तिक शंकांचे निरसन करत तज्ज्ञ वकिलांनी आवश्यक कायदेशीर सल्ला दिला.

यावेळी न्याय विश्वास फाउंडेशनचे संस्थापक ॲड. अनिकेत उज्वल निकम यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, न्यायव्यवस्थेबाबत विश्वास निर्माण करणे आणि मोफत कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे. आगामी काळात जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात अशा स्वरूपाची आणखी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिबिराला लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. न्याय विश्वास फाउंडेशनचा हा उपक्रम कायद्याविषयी जनजागृती आणि सर्वसामान्य नागरिकांना सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *