जुन्नरमधील कथित बनावट आईस्क्रीम प्रकरणानंतर नागरिकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज
जुन्नरमधील कथित बनावट आईस्क्रीम प्रकरणानंतर नागरिकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज; परवानाधारक उत्पादनांनाच द्या पसंती
वंदे भारत न्यूज एक्सप्रेस | विशेष प्रतिनिधी
जुन्नर तालुक्यातील १४ नंबर परिसरात कथित बनावट आईस्क्रीम तयार करणाऱ्या एका कारखान्याचा भांडाफोड झाल्याची माहिती समोर आल्यानंतर अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारवाईची चाहूल लागताच संबंधित कामगार आणि मालक घटनास्थळावरून पसार झाल्याचा दावा करण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या कारखान्यात तयार होणाऱ्या आईस्क्रीममध्ये दूध किंवा खवा वापरण्याऐवजी विविध रासायनिक पदार्थ, कृत्रिम फ्लेवर आणि रंगांचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. घटनास्थळी डिटर्जंट पावडर, कृत्रिम फ्लेवर, मावा-मलाई फ्लेवर तसेच इतर संशयास्पद साहित्य आढळल्याचा दावा करण्यात आला असून त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, मावा कुल्फी आणि विविध फ्लेवर्सची आईस्क्रीम लहान मुलांकडून मोठ्या प्रमाणात खाल्ली जात असल्याने हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून अशा कारखान्यांवर तातडीने टाळे ठोकावेत, अशी मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. रस्त्याच्या कडेला, अनधिकृत ठिकाणी किंवा अत्यल्प दरात विक्री होणारे आईस्क्रीम, कुल्फी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी. उत्पादनावरील FSSAI परवाना क्रमांक, उत्पादकाचे नाव, उत्पादन तारीख, कालबाह्यता तारीख आणि पॅकिंगची स्थिती तपासूनच खरेदी करावी.
लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करता पालकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. केवळ विश्वासार्ह आणि परवानाधारक उत्पादकांचेच आईस्क्रीम खरेदी करावे. संशयास्पद किंवा अनधिकृत ठिकाणी तयार होणारे खाद्यपदार्थ टाळणे हीच सुरक्षिततेची पहिली पायरी आहे.
अन्नाच्या गुणवत्तेबाबत कोणताही संशय आल्यास नागरिकांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन (FDA) किंवा अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) यांच्याकडे तक्रार नोंदवावी. नागरिकांची जागरूकता आणि प्रशासनाची कठोर कारवाई यामुळेच अशा गैरप्रकारांना आळा घालणे शक्य होईल.
वंदे भारत न्यूज एक्सप्रेसचे आवाहन :
स्वस्तापेक्षा सुरक्षित अन्नाला प्राधान्य द्या. आईस्क्रीम खरेदी करण्यापूर्वी एकदा तपासा. आपल्या कुटुंबाच्या आणि विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड करू नका.





