मंचरमध्ये बनावट दुधाचा महाघोटाळा उघड; डिटर्जंट, शाम्पू मिसळून विकले जात होते विषारी दूध
मंचरमध्ये बनावट दुधाचा महाघोटाळा उघड; डिटर्जंट, शाम्पू मिसळून विकले जात होते विषारी दूध
पुण्यात २,००० कोटींच्या बनावट दुधाच्या रॅकेटचा पर्दाफाश; FDA-पोलिसांची धडक कारवाई
पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या धडक कारवाईत पुणे जिल्ह्यातील मंचर येथे बनावट आणि सिंथेटिक दूध तयार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ४ ते ५ जुलै २०२६ दरम्यान झालेल्या या कारवाईत दररोज हजारो लिटर विषारी दूध बाजारात विकले जात असल्याचे उघड झाले असून, या रॅकेटची वार्षिक उलाढाल तब्बल २,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अवघ्या ५ रुपयांच्या रासायनिक मिश्रणातून तयार केलेले दूध ७० रुपये प्रति लिटर दराने विकले जात होते. शासकीय प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये हे दूध खरे वाटावे यासाठी विविध रसायने आणि कृत्रिम घटकांचा वापर करण्यात येत होता.
डिटर्जंट, शाम्पू आणि तेलांचा वापर
या बनावट दुधात प्रोटीन वाढवण्यासाठी वे पावडर, SNF वाढवण्यासाठी स्कीम्ड मिल्क पावडर (SMP), फॅटसाठी वनस्पती तेल किंवा पाम तेलाचा वापर केला जात होता. दुधाला पांढरा रंग आणि घट्टपणा मिळावा यासाठी डिटर्जंट, शाम्पू आणि लिक्विड इमल्सिफायरसारखे आरोग्यासाठी अत्यंत घातक पदार्थ मिसळले जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
४ हजार किलोहून अधिक साहित्य जप्त
मंचर येथील ‘मेसर्स नवकार डिस्ट्रीब्यूटर्स’ या गोदामातून भेसळीसाठी वापरली जाणारी १,३८५ किलो पावडर, डिटर्जंट आणि विविध रसायने जप्त करण्यात आली. तर पिंपळगाव खडकी येथील ‘जय श्रीराम डेअरी फार्म’वर छापा टाकून २,७६७ किलो तयार बनावट सिंथेटिक दूध जप्त करण्यात आले. हे दूध विक्रेत्याच्या संमतीने शेतात ओतून नष्ट करण्यात आले.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती दामोदर म्हस्के यांनी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, तपासाचा वेग वाढविण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांपर्यंत जाळे
या रॅकेटचे जाळे केवळ पुण्यापुरते मर्यादित नसून पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि जळगावसह ६ ते ७ जिल्ह्यांमध्ये पसरल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी २६ जणांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुख्य सूत्रधारांमध्ये सुशांत हिंगे, संदीप लोढा, हेमंत टेके, संजोग यादव यांच्यासह काही स्थानिक डेअरी चालकांचा समावेश असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.
कठोर कारवाईचा इशारा
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सांगितले की, “हे रॅकेट थेट जनतेच्या आरोग्याशी खेळत होते. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि कायद्यानुसार शिक्षा मिळवून दिली जाईल.”
सध्या FDA आणि पोलीस या रॅकेटची वितरण साखळी, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुराव्यांचा तपास करत आहेत. जप्त नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवालानंतर आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वंदे भारत न्यूज एक्सप्रेस
सत्य | निर्भीड | वेगवान
मुख्य संपादक : औदुंबर पाडुळे
www.vandebharatnewsexpress.com�





