रावेत-भोंडवे कॉर्नरवर भर सिग्नलमध्ये अनधिकृत होर्डिंग; वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
रावेत-भोंडवे कॉर्नरवर भर सिग्नलमध्ये अनधिकृत होर्डिंग; वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
सिग्नल झाकला जात असल्याने अपघाताचा धोका; वाहतूक विभाग आणि महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष?
वंदे भारत न्यूज एक्सप्रेस | रावेत
रावेत येथील भोंडवे कॉर्नर चौकात वाहतूक सिग्नलच्या अगदी समोर उभारण्यात आलेल्या एका मोठ्या होर्डिंगमुळे वाहनचालकांची चांगलीच गैरसोय होत आहे. भर चौकात उभारलेले हे होर्डिंग सिग्नलच्या दृश्यमानतेवर परिणाम करत असल्याने वाहनचालकांना सिग्नल स्पष्टपणे दिसत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
या मार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. अशा परिस्थितीत वाहतूक सिग्नलसमोरच उभारण्यात आलेले होर्डिंग अपघाताला निमंत्रण देणारे ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. विशेषतः पावसाळ्यात दृश्यमानता कमी असताना ही समस्या अधिक गंभीर बनत आहे.
नियमांनुसार वाहतूक सिग्नल, चौक आणि रस्त्यावरील सुरक्षिततेवर परिणाम होईल अशा ठिकाणी जाहिरात फलक उभारण्यास निर्बंध आहेत. मात्र या ठिकाणी असे होर्डिंग कसे उभारण्यात आले, त्याला संबंधित विभागाची परवानगी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिकांनी तातडीने या होर्डिंगची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी वाहतूक विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
— वंदे भारत न्यूज एक्सप्रेस





