बीड येथील नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज पवार कुटुंबाच्या भेटीला; दुःखात दिला आधार

बीड येथील नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज पवार कुटुंबाच्या भेटीला; दुःखात दिला आधार
वंदे भारत न्यूज एक्सप्रेस नेटवर्क
पुणे : बीड जिल्ह्यातील धाकटी पांढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पवार कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेत दुःखात सहभागी होत सांत्वन केले.
सोमवारी सकाळी विद्या प्रतिष्ठान बारामती येथे ही भेट पार पडली. यावेळी महंत शिवाजी महाराज यांनी पवार कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद साधत, या कठीण काळात धीर, संयम आणि श्रद्धा ठेवण्याचा संदेश दिला. त्यांच्या शब्दांतून मानवी संवेदना आणि आध्यात्मिक बळ स्पष्टपणे जाणवत होते.
या भेटीदरम्यान शरद पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. पार्थ आणि जय पवार हे भावनिक झाल्याचे चित्र दिसून आले. उपस्थित वातावरण गंभीर असले तरी, महंत शिवाजी महाराजांच्या शब्दांनी कुटुंबीयांना मानसिक आधार मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या सांत्वनपर भेटीचे बीडसह राज्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळात कौतुक होत असून, दुःखाच्या प्रसंगी मिळणारा असा आध्यात्मिक आणि मानवी आधार समाजाला सकारात्मक दिशा देणारा ठरत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.




