नेते ते अभिनेते… AI च्या ‘या’ ट्रेंडने लावलंय सर्वांनाच वेड!
नेते ते अभिनेते… AI च्या ‘या’ ट्रेंडने लावलंय सर्वांनाच वेड!
८०च्या दशकातील हिरो-हिरोईनच्या लूकमध्ये फोटो बनवण्याची सोशल मीडियावर क्रेझ; काही मिनिटांत जुन्या काळाची झलक
पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या वापरामुळे सोशल मीडियावर सध्या फोटो एडिटिंगचे नवनवीन ट्रेंड पाहायला मिळत आहेत. त्यातच ८०च्या दशकातील हिंदी-मराठी चित्रपटांच्या हिरो-हिरोईनसारखा लूक देऊन फोटो तयार करण्याचा ट्रेंड सध्या चांगलाच लोकप्रिय झाला आहे. सामान्य नागरिकांपासून नेते, कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सपर्यंत अनेकजण या ट्रेंडचा अनुभव घेताना दिसत आहेत.
जुन्या काळातील चित्रपटांची पोस्टर्स, त्या काळातील कपडे, हेअरस्टाईल, रंगसंगती आणि सिनेमॅटिक पार्श्वभूमी यांचा वापर करून AIच्या मदतीने अगदी ८०च्या दशकातील छायाचित्रासारखा लूक तयार केला जात आहे. त्यामुळे सध्याचा फोटो काही क्षणांत जुन्या काळातील फिल्मी आठवणींमध्ये बदलताना दिसतो.
नेतेही बनत आहेत ‘फिल्मी हिरो’
सोशल मीडियावर या ट्रेंडची विशेष चर्चा रंगण्यामागे राजकीय नेत्यांचेही फोटो कारणीभूत ठरत आहेत. अनेक नेत्यांचे फोटो ८०च्या दशकातील अभिनेत्यांच्या स्टाईलमध्ये तयार करून शेअर केले जात आहेत. पारंपरिक पोशाखांपासून ते त्या काळातील फिल्मी फॅशनपर्यंत विविध प्रयोग AIच्या माध्यमातून केले जात आहेत.
कसा तयार करायचा ८०s लूक?
AI फोटो जनरेशन किंवा फोटो एडिटिंग करणाऱ्या साधनांमध्ये स्वतःचा स्पष्ट फोटो वापरून त्याला १९८०च्या दशकातील भारतीय सिनेमाच्या शैलीत रूपांतर करण्यासाठी योग्य सूचना (Prompt) देता येतात. उदाहरणार्थ, ‘८०च्या दशकातील बॉलीवूड फिल्म स्टार’, ‘रेट्रो सिनेमॅटिक लूक’, ‘व्हिंटेज फिल्म पोस्टर’, ‘फिल्म ग्रेन’, ‘रेट्रो कलर टोन’ अशा सूचना दिल्यास त्यानुसार प्रतिमा तयार केली जाऊ शकते.
मात्र AI तयार केलेला फोटो हा प्रत्यक्षातील छायाचित्र नसून डिजिटल पद्धतीने तयार केलेली प्रतिमा असल्याचे लक्षात घेणे आवश्यक आहे. विशेषतः सार्वजनिक व्यक्तींचे फोटो वापरताना त्याचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
सोशल मीडियावर आठवणींची ‘रेट्रो’ सफर
या ट्रेंडमुळे अनेकांना आपल्या आवडत्या जुन्या कलाकारांच्या काळातील लूक अनुभवण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे ८०च्या दशकातील सिनेमाची आठवण करून देणारे AI फोटो सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.





