गुन्हेगारी

दुर्गराज राजगडाच्या संवर्धनासाठी हजारो मावळ्यांचे श्रमदान; खासदार निलेश लंके यांची उपस्थिती


हजारो मावळ्यांच्या श्रमदानातून राजगड संवर्धनाचा संकल्प!

‘आपला मावळा’च्या १७व्या दुर्गसंवर्धन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीने मोहिमेला बळ

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची तब्बल २६ वर्षे राजधानी राहिलेल्या दुर्गराज राजगडाच्या संवर्धनासाठी हजारो स्वयंसेवक एकवटले. ‘आपला मावळा’च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या १७व्या दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहिमेत हजारो शिवप्रेमी आणि स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले. या मोहिमेला अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांचीही उपस्थिती लाभली.

मोहिमेदरम्यान राजगडावरील विविध भागांची स्वच्छता करण्यात आली. कचरा संकलनासोबतच गडावरील डागडुजी, दगड-दुरुस्ती, आवश्यक ठिकाणी नामफलक लावणे आणि विविध संवर्धनाची कामे करण्यात आली.

राजगड हा केवळ एक किल्ला नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. हा ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

राजगडासाठी मूलभूत सुविधांची मागणी

राजगडाच्या संवर्धनाबरोबरच येथे येणाऱ्या पर्यटक आणि शिवप्रेमींसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली. राजगडाकडे जाणारा रस्ता सुस्थितीत करणे, महिलांसाठी स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था करणे तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासोबतच पर्यटकांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून राजगडाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

हजारो मावळ्यांच्या श्रमदानातून राजगडाच्या संवर्धनासाठी लोकसहभागाची ताकद पुन्हा एकदा दिसून आली. इतिहास जपण्याची जिद्द आणि त्यासाठी एकजुटीने केलेले प्रयत्न असतील, तर परिवर्तन घडतेच, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *