ताज्या घडामोडीपुणे / पीसीएमसीसामाजिक

हरित भविष्यासाठी शिवराम सोशल फाऊंडेशनचा पुढाकार


हरित भविष्यासाठी शिवराम सोशल फाऊंडेशनचा पुढाकार

वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; लावलेल्या रोपांच्या संगोपनाचा संकल्प

पिंपरी-चिंचवड : वाढते प्रदूषण, झपाट्याने कमी होत जाणारे हरित क्षेत्र आणि पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल लक्षात घेता वृक्षसंवर्धनाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. याच सामाजिक बांधिलकीतून शिवराम सोशल फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा केवळ संदेश न देता लावलेल्या प्रत्येक रोपाचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. ‘झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा’ हा संदेश देत नागरिकांनीही वृक्षारोपणासोबतच झाडांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमास शिवराम सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. रमेश तिरखुंडे, सचिव संतोष उणवणे यांच्यासह रामदास कुटे, निलेश भालेकर, विकास पवार, प्रमोद बनसोडे आणि सचिन बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. आज लावलेले एक रोप भविष्यात मोठे वृक्ष बनून पुढील पिढीला शुद्ध हवा, सावली आणि निरोगी पर्यावरण देणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प करावा, असा संदेश उपस्थितांना देण्यात आला.

वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा उपक्रम न राहता त्याचे सातत्याने संवर्धन होणे आवश्यक आहे. या उद्देशाने शिवराम सोशल फाऊंडेशनने वृक्षांच्या संगोपनावरही भर दिला. सामाजिक बांधिलकीसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा फाऊंडेशनचा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *