यमुनानगर येथे स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय सांगता
यमुनानगर येथे स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय सांगता
निगडी : यमुनानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट तर्फे स्वामी समर्थ यांच्या प्रकटदिनानिमित्त भव्य दिव्य शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दि. १३ ते शुक्रवार दि. २० या कालावधीत पार पडलेल्या या सप्ताहास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या सप्ताहात शिवकथाकार ह.भ.प. वैभव महाराज माळवदे (शेवगाव) यांच्या अमृतवाणीने दररोज सायं. ५.३० ते ८.३० या वेळेत शिवमहापुराण कथानिरूपण झाले. सप्ताहात शिवपुराण महात्म्य, शिवपार्वती विवाह, गणेश अवतार, बारा ज्योतिर्लिंग महिमा, महाशिवरात्री महात्म्य, ओम नमः शिवाय नाममहिमा आदी विषयांवर सखोल विवेचन करण्यात आले.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने विशेष पालखी प्रदक्षिणा सोहळा पार पडला. तसेच दररोज सकाळी काकड आरती, सायंकाळी हरिनाम संकीर्तन व विविध भजनी मंडळांच्या भजन कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. सप्ताहादरम्यान शिवकृपा, सिद्धिविनायक, हरी ओम, साईराज, श्रीराम, स्वामी कृपा, दत्तकृपा आदी भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला.
शुक्रवार दि. २० रोजी सकाळी ६ वाजता अभिषेक, पूजन व होमहवन पार पडले. त्यानंतर ह.भ.प. चैतन्य महाराज बाडेकर (इंदापूर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची भावपूर्ण सांगता झाली. कीर्तनानंतर महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी साधना महिला भजनी मंडळ, सोलापूर यांच्या भजनाने वातावरण अधिक भक्तिरसपूर्ण झाले.
या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्ताह यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष शशिकिरण गवळी व सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले.





