१४३ कोटी भरा, नाहीतर शहराचा नळ बंद!” – जलसंपदा विभागाचा महापालिकेला इशारा
“१४३ कोटी भरा, नाहीतर शहराचा नळ बंद!” – जलसंपदा विभागाचा महापालिकेला इशारा
थकीत रक्कम तातडीने भरा, अन्यथा शहराचा पाणीपुरवठा बंद
पिपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यावर टांगती तलवार आली असून, थकीत रक्कम तातडीने न भरल्यास पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा कडक इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. तब्बल १४३ कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
पिंपरी-चिंचवड शहराला प्रामुख्याने पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दररोज सुमारे ५७० एमएलडी अशुद्ध पाणी उचलते. या पाण्याचे शुद्धीकरण करून शहरातील विविध भागात टाक्यांद्वारे वितरण केले जाते. मात्र, पाणी उचल शुल्क व इतर देयके वेळेवर न भरल्यामुळे जलसंपदा विभागाकडून दंड आकारण्यात येत असून थकबाकीचा आकडा १४३ कोटींवर पोहोचला आहे.
जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, थकीत रक्कम तत्काळ जमा न केल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाईल. ऐन उन्हाळ्यात अशा कारवाईमुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महापालिकेकडून पाणीपुरवठा नियमित सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता मर्यादित असल्याने केवळ २७५ एमएलडी पाण्यावरच प्रक्रिया केली जाते, उर्वरित पाणी प्रक्रियेशिवाय नदीपात्रात सोडले जात असल्याचा ठपकाही विभागाकडून ठेवण्यात आला आहे.
वाढते तापमान, वाढती लोकसंख्या आणि वाढती पाण्याची मागणी या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने आर्थिक व तांत्रिक तोडगा काढणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
ऐन उन्हाळ्यात शहरवासीयांच्या तोंडचे पाणी पळू नये, यासाठी महापालिकेने जलसंपदा विभागाशी समन्वय साधून थकबाकीचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.





