थेरगाव महापालिका रुग्णालयातील MRI केंद्राचा भोंगळ कारभार; रुग्णांची रात्रभर फरफट!
थेरगाव महापालिका रुग्णालयातील MRI केंद्राचा भोंगळ कारभार; रुग्णांची रात्रभर फरफट!
अपॉइंटमेंट असूनही तासन्तास प्रतीक्षा • ज्येष्ठ नागरिकांसह नातेवाईक त्रस्त • वशिल्याने लवकर नंबर लागतो का? नागरिकांमध्ये चर्चा
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी
सर्वसामान्य आणि गोरगरिबांसाठी आधारवड मानल्या जाणाऱ्या थेरगाव महापालिका रुग्णालयातील MRI केंद्राच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. MRI, CT Scan, 2D Echo, सोनोग्राफी आदी चाचण्यांचे काम रुबी एलकेअर सर्व्हिसेस प्रा. लि. या संस्थेकडे देण्यात आले असले तरी अपॉइंटमेंट असूनही रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका ज्येष्ठ नागरिक रुग्णाला सकाळी 11 वाजता नोंदणी केल्यानंतर MRI चाचणीसाठी रात्री 12 वाजताची अपॉइंटमेंट देण्यात आली होती. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक नियोजित वेळेपूर्वी रात्री 11.30 वाजता रुग्णालयात दाखल झाले. मात्र रिसेप्शनवरील कर्मचाऱ्यांनी आणखी दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागेल, असे सांगितल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली.
MRI चाचणीसाठी येणारे अनेक रुग्ण आधीच मानसिक तणावाखाली असतात. त्यात ज्येष्ठ नागरिकांना मध्यरात्रीपर्यंत थांबविणे आणि अपॉइंटमेंटच्या वेळेनंतरही निश्चित माहिती न देणे, यामुळे रुग्ण व नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नातेवाईकांचा आरोप
रुग्णालयात उपस्थित असलेल्या एका नातेवाईकाने सांगितले, “आम्ही सायंकाळी साडेनऊ वाजता येथे आलो. दीड तासात नंबर येईल असे सांगितले गेले. मात्र रात्री एक वाजूनही आमच्या पुढे तीन रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रुग्णाला मोठा त्रास सहन करावा लागला.”
वशिल्याच्या चर्चांना उधाण
दरम्यान, रुग्णालय परिसरात काही व्यक्तींना ओळख आणि वशिल्याच्या जोरावर लवकर नंबर मिळत असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. काही नातेवाईकांनी दबक्या आवाजात अशी चर्चा केली की, प्रभावशाली व्यक्तींच्या शिफारशीमुळे काही रुग्णांचे नंबर प्राधान्याने लावले जातात. एका व्यक्तीने तर “माझी सेटिंग झाली आहे” असा दावा केल्याची चर्चा रुग्णालय परिसरात ऐकायला मिळाली. मात्र या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
सर्वसामान्य रुग्णांना मनस्ताप
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची रुग्णालये ही गोरगरिबांसाठी परवडणाऱ्या उपचारांचे केंद्र म्हणून ओळखली जातात. कमी खर्चात विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्या तरी व्यवस्थापनातील त्रुटी आणि वाढती प्रतीक्षा यामुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
रोजंदारीवर काम करणारे कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि कोणताही वशिला नसलेले रुग्ण यांना उपचारासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असेल तर ही बाब गंभीर मानली जात आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून MRI व इतर चाचण्यांच्या वेळापत्रकात पारदर्शकता आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रुग्णांचा सवाल
▪️ अपॉइंटमेंट असूनही तासन्तास प्रतीक्षा का?
▪️ ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे का?
▪️ MRI केंद्रात रुग्ण व्यवस्थापनाची जबाबदारी कोणाची?
▪️ कथित वशिल्याच्या चर्चांची चौकशी होणार का?
▪️ रुग्णांना वेळेवर सेवा देण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलणार?





