ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम यांच्या नेतृत्वाखाली न्याय विश्वास फाउंडेशनचे मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी जळगावात भव्य मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिर
ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम यांच्या नेतृत्वाखाली न्याय विश्वास फाउंडेशनचे मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
जळगाव | प्रतिनिधी
सामान्य नागरिकांना कायदेशीर बाबींची योग्य माहिती मिळावी, न्याय मिळविण्याचा मार्ग सुकर व्हावा आणि आर्थिक अडचणींमुळे कोणालाही कायदेशीर सल्ल्यापासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने न्याय विश्वास फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने रविवार, २६ जुलै २०२६ रोजी भव्य मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ॲड.अनिकेत उज्ज्वल निकम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून, समाजातील सर्वसामान्य नागरिकांना कायद्याचे सुलभ मार्गदर्शन मिळावे, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश आहे.
या शिबिरामध्ये जमीन व मालमत्तेशी संबंधित वाद, ७/१२ उतारे, वारसा हक्क, फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक व वैवाहिक वाद, महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क, सायबर फसवणूक व ऑनलाइन गुन्हे, ग्राहक संरक्षण कायदा, कामगार, वेतन व रोजगार विषयक प्रश्न तसेच पोलिस तक्रार, एफआयआर आणि इतर कायदेशीर प्रक्रियांबाबत तज्ज्ञ वकिलांकडून मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या वैयक्तिक समस्यांचे स्वरूप जाणून त्यांना योग्य कायदेशीर दिशा दिली जाणार आहे.
हे शिबिर रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत नूतन मराठा महाविद्यालय सभागृह, जळगाव येथे होणार आहे. शिबिराचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी आधार कार्ड, संबंधित प्रकरणाशी निगडित कागदपत्रे, जमीन किंवा मालमत्तेची कागदपत्रे तसेच न्यायालयीन अथवा पोलिसांची कागदपत्रे (असल्यास) सोबत आणावीत, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
सामान्य नागरिकांना न्यायप्रक्रियेची माहिती देऊन त्यांचे प्रश्न योग्य पद्धतीने सोडविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. कायदेशीर अडचणीत असलेल्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९६५३६४७०७०





