NEET विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ २६ जुलैला ‘तिरंगा मार्च’; पक्षाचे झेंडे, नेत्यांच्या घोषणा नकोत – राज ठाकरे
NEET विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ २६ जुलैला ‘तिरंगा मार्च’; पक्षाचे झेंडे, नेत्यांच्या घोषणा नकोत – राज ठाकरे
मुंबई | वंदे भारत न्यूज एक्सप्रेस नेटवर्क
NEET परीक्षेतील कथित गोंधळ, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नांविरोधात शनिवार, २६ जुलै रोजी मुंबईत ‘तिरंगा मार्च’ आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांना पत्राद्वारे आवाहन करत मार्च पूर्णपणे अराजकीय ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
मार्चमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा, बॅनर किंवा नेत्यांच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या जाणार नाहीत. हा मोर्चा विद्यार्थी, त्यांचे पालक आणि देशभरातील तरुणांच्या समर्थनासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच स्वतःच्या किंवा इतर कोणत्याही नेत्याच्या नावाने घोषणाबाजी करू नये, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना बजावले आहे.
मार्चदरम्यान शांतता आणि शिस्त राखण्याचे आवाहन करत, वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. विद्यार्थी, पालक आणि महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांनी या मार्चमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. सर्व सहभागी नागरिकांनी २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता शिवाजी पार्क येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





