पवना नदीच्या पवित्र जलाने घोरवडेश्वर महादेवाचा जलाभिषेक; कावड यात्रेत शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग
पवना नदीच्या पवित्र जलाने घोरवडेश्वर महादेवाचा जलाभिषेक; कावड यात्रेत शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग
मावळ : पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र घोरवडेश्वर येथे सोमवारी भक्तिमय वातावरणात कावड यात्रा उत्साहात पार पडली. पवना नदीचे पवित्र जल कावडीतून आणून घोरवडेश्वर महादेवाचा विधिवत जलाभिषेक करण्यात आला. या कावड यात्रेत मोठ्या संख्येने शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
श्री क्षेत्र घोरवडेश्वर गौरीक्षनाथ सेवा ट्रस्ट आणि आदेश सेवा मंडळ यांच्या वतीने या कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेसहा वाजता पवना नदीकाठ, गहुंजे येथून कावड यात्रेला सुरुवात झाली. यावेळी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषात शिवभक्तांनी कावडीतून पवित्र जल घेऊन घोरवडेश्वराच्या दिशेने प्रस्थान केले.
कावड यात्रेचा मार्ग गहुंजे पवना नदी – मामुर्डी – शीतलनगर – देहूरोड – सेंट्रल – घोरवडेश्वर डोंगर असा होता. भगवे वस्त्र परिधान केलेले शिवभक्त, खांद्यावर कावड आणि मुखी ‘हर हर महादेव’चा जयघोष, यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
पवना नदीचे पवित्र जल घोरवडेश्वर मंदिरात आणल्यानंतर विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर या जलाने घोरवडेश्वर महादेवाचा जलाभिषेक करण्यात आला. श्रावण महिन्याच्या पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त आयोजित या धार्मिक उपक्रमाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
यात्रेदरम्यान शिवभक्तांनी शिस्तबद्ध पद्धतीने कावड घेऊन मार्गक्रमण केले. विविध ठिकाणी भाविकांचे स्वागत करण्यात आले. गहुंजे, मामुर्डी, देहूरोड परिसरासह घोरवडेश्वर डोंगर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
मुख्य पूजारी हरि महाराज बोडके यांनी कावड यात्रेची माहिती देताना सांगितले की, श्रावण महिन्यात पवना नदीचे पवित्र जल घोरवडेश्वर महादेवाला अर्पण करण्याची परंपरा भक्तिभावाने पार पाडण्यात आली. शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कावड यात्रेला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले.
‘हर हर महादेव’च्या जयघोषात झालेल्या या कावड यात्रेत शिवभक्तांनी पवना नदीच्या पवित्र जलाने घोरवडेश्वर महादेवाचा जलाभिषेक करून भक्तिभावाने श्रावणी सोमवार साजरा केला.





