मुसळधार पावसाचा फटका! ताम्हिणी घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद
मुसळधार पावसाचा फटका! ताम्हिणी घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद
दरड कोसळण्याचा धोका वाढला; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

पुणे | प्रतिनिधी
पुणे आणि कोकणाला जोडणारा महत्त्वाचा ताम्हिणी घाट मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीमुळे पुढील आदेशापर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटातील आदरवाडी परिसरात रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. तसेच डोंगरकड्यांवरून दरड कोसळण्याचा धोका वाढल्याने वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला आहे.
उपविभागीय अधिकारी (मावळ-मुळशी), पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पौड–माणगाव (ताम्हिणी घाट) मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. रायगड जिल्ह्यातील प्रशासनालाही आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांतही जोरदार पावसाचा इशारा दिल्याने पर्यटकांनी आणि वाहनचालकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, ताम्हिणी घाट मार्गाचा वापर करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या पुणे, रायगड, मुंबई महानगर क्षेत्र तसेच कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.





