निगडीतील सिद्धीविनायकनगरीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
सिद्धीविनायकनगरीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
निगडी, प्रतिनिधी : निगडी येथील सिद्धीविनायकनगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. परिसरात भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी तानाजी काळभोर यांनी आपल्या मनोगतात शिवरायांच्या पराक्रमाचा, स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा तसेच महिलांप्रती दाखविलेल्या आदराचा गौरव केला. शिवरायांचे विचार आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात कृतीतून उतरवावेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सिद्धीविनायक नगरीतील श्रीमती सरस्वती साबळे (वय ७४) यांनी मध्यप्रदेश येथे झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्य अशी तीन पदके पटकाविल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
शिवभक्त कु. संस्कृती सुधीर ढगे पाटील हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर मानवंदना दिली. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय”, “जय जिजाऊ, जय शिवराय” अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.
या कार्यक्रमास शिवाजी काळभोर, उमाशंकर सिंह, सुधीर ढगे पाटील, नंदू भागवत, बाळासाहेब आवंढे, योगेश काळभोर, बन्सी रोडे, मधुकर रसाळ तसेच महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





