‘चलो दिल्ली’चा निर्धार; EPS-95 पेन्शनधारकांचा जंतर-मंतरवर तीन दिवसीय महाआंदोलन
‘चलो दिल्ली’चा निर्धार; EPS-95 पेन्शनधारकांचा जंतर-मंतरवर तीन दिवसीय महाआंदोलन
पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो पेन्शनर्स दिल्लीकडे रवाना
पिंपरी चिंचवड: अत्यल्प आणि तुटपुंज्या पेन्शनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या देशभरातील EPS-95 पेन्शनधारकांनी आता निर्णायक लढ्याचा मार्ग स्वीकारला आहे. EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने दि. ९, १० आणि ११ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर भव्य महाआंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या काय?
सध्या अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ५००, १०००, १५०० रुपयांपर्यंत तुटपुंजी पेन्शन मिळत आहे. वाढत्या महागाईत ही रक्कम अत्यंत अपुरी ठरत असल्याने समितीच्या वतीने पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत –
किमान मासिक पेन्शन ७५०० रुपये निश्चित करावी
महागाई भत्ता (DA) लागू करावा
पती-पत्नी दोघांनाही मोफत वैद्यकीय सुविधा द्याव्यात
पेन्शन व्यवस्थेत सुधारणा करून ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगण्याची हमी द्यावी
देशभरातून दिल्लीकडे मोर्चा
या आंदोलनासाठी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून हजारो पेन्शनर्स दिल्लीकडे रवाना झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो पेन्शनर्स आकुर्डी रेल्वे स्टेशन येथून घोषणाबाजी करत दिल्लीकडे रवाना झाले. ‘चलो दिल्ली’, ‘पेन्शनर्सना न्याय द्या’, ‘७५०० रुपये पेन्शन हक्काची’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
नेतृत्व व नियोजन
या आंदोलनाचे नेतृत्व समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत करत असून, राष्ट्रीय पदाधिकारी तसेच राज्य व जिल्हास्तरीय जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली देशव्यापी नियोजन करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तानाजी काळभोर आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पातळीवर संघटनबांधणी करून मोठ्या संख्येने पेन्शनर्स आंदोलनात सहभागी झाले आहेत.

पेन्शनर्सची भावना
अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, आयुष्यभर सेवा केल्यानंतर मिळणारी पेन्शन ही सन्मानाने जगण्यासाठी पुरेशी असावी. औषधोपचार, घरखर्च, भाडे, वीजबिल, दैनंदिन गरजा या सर्व बाबींचा खर्च प्रचंड वाढला असून, सध्याची पेन्शन अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
सरकारकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा
जंतर-मंतरवरील या तीन दिवसीय महाआंदोलनाकडे देशभरातील लाखो EPS-95 पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करून तोडगा काढण्याची तयारी दर्शवली असून, सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
‘सन्मानाने जगण्याचा हक्क’ या भावनेतून उभारलेले हे आंदोलन देशातील पेन्शनधारकांच्या हक्कासाठीचा मोठा टप्पा ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.





