महाराष्ट्रात ओला, उबर आणि रॅपिडो बाईक टॅक्सीवर बंदी; राज्य सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्रात ओला, उबर आणि रॅपिडो बाईक टॅक्सीवर बंदी; राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : महाराष्ट्रात ओला, उबर आणि रॅपिडो यांच्या बाईक टॅक्सी सेवांवर राज्य शासनाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, परवाना अटींचे उल्लंघन आणि विद्यमान वाहतूक नियमांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राज्यात सध्या अॅपआधारित बाईक टॅक्सी सेवा मोठ्या प्रमाणावर सुरू होती. मात्र, मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकी वाहनांचा व्यावसायिक वापर करण्यास स्पष्ट परवानगी नसल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित होत होता. तसेच अनेक बाईक टॅक्सी चालकांकडे आवश्यक व्यावसायिक परवाने आणि विमा संरक्षण नसल्याचेही निदर्शनास आले होते.
या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने कारवाईचा इशारा दिला असून संबंधित कंपन्यांना सेवा तत्काळ बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे रोजच्या प्रवासासाठी बाईक टॅक्सीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा लागणार आहे. तर दुसरीकडे, या क्षेत्रात कार्यरत असलेल्या हजारो चालकांवर उपजीविकेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारकडून याबाबत सविस्तर शासन निर्णय (GR) लवकरच जारी केला जाणार असल्याची माहिती आहे.





