लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता! फेब्रुवारीचा सन्मान निधी वितरणास सुरुवात; ३ दिवसांत थेट खात्यात जमा
लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता! फेब्रुवारीचा सन्मान निधी वितरणास सुरुवात; ३ दिवसांत थेट खात्यात जमा
वंदे भारत न्यूज एक्सप्रेस | प्रतिनिधी
राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये पुढील तीन दिवसांत निधी थेट जमा होणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. घरगुती खर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य तसेच दैनंदिन गरजांसाठी हा निधी उपयोगी ठरणार असल्याचे लाभार्थी महिलांनी सांगितले. शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे निधी जमा केला जात असल्यामुळे कोणत्याही प्रकारची मध्यस्थी न होता रक्कम थेट खात्यात जमा होत आहे.
शासनाने लाभार्थींनी आपले आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न (आधार सीडींग ) असल्याची खात्री करून घ्यावी, तसेच मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवावा, असे आवाहन केले आहे. काही तांत्रिक अडचणी असल्यास संबंधित बँक किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचेही सूचित करण्यात आले आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची पायरी मानली जात आहे. महिलांना स्वावलंबी बनविणे आणि कुटुंबाच्या अर्थकारणात त्यांचा सहभाग अधिक मजबूत करणे हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.
दरम्यान, निधी जमा झाल्यानंतर अनेक महिलांनी शासनाचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे. आगामी काळातही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.





