ताज्या घडामोडी

निगडीतील अंकुश चौकात थरार कायम; टॉवरवरील व्यक्ती खाली येत नसल्याने पोलीस- अग्निशमन दल हतबल


निगडी अंकुश चौकात थरार कायम; टॉवरवरील व्यक्ती खाली येत नसल्याने पोलीस- अग्निशमन दल हतबल

निगडी : निगडीतील अंकुश चौक येथे हायटेन्शन वीज टॉवरवर चढलेल्या व्यक्तीमुळे निर्माण झालेला तणाव अद्याप कायम असून, अनेक तास उलटूनही संबंधित व्यक्ती खाली उतरायला तयार नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी उसळली असून, परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस, अग्निशमन दल तसेच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, वारंवार समजूत काढूनही संबंधित व्यक्ती टॉवरवरच ठाम उभा असल्याने पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

पोलिसांकडून संबंधित व्यक्तीशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू असून, त्याच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. अग्निशमन दलाने जाळी व इतर बचाव साहित्य तयार ठेवले असले तरी उंची आणि टॉवरची रचना लक्षात घेता बचावकार्य कठीण ठरत आहे.

दरम्यान, काही स्थानिक नागरिक व संबंधित व्यक्तीच्या ओळखीच्या व्यक्तींमार्फत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही तो खाली उतरायला तयार नसल्याने प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे चित्र आहे.

या घटनेमुळे अंकुश चौक परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला असून, पोलिसांनी काही मार्गांवर तात्पुरती निर्बंध लागू केले आहेत.

याशिवाय, भक्ती शक्ती चौक ते त्रिवेणी नगर या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे काही चारचाकी वाहनांचे किरकोळ अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

नागरिकांनी घटनास्थळी गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित व्यक्ती सुरक्षित खाली आल्यानंतरच पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *