निगडी अंकुश चौकात टॉवर थराराचा शेवट; फायर ब्रिगेडच्या रेस्क्यू टीमकडून व्यक्तीची सुखरूप सुटका
निगडी अंकुश चौकात टॉवर थराराचा शेवट; फायर ब्रिगेडच्या रेस्क्यू टीमकडून व्यक्तीची सुखरूप सुटका
पिंपरी चिंचवड : निगडीतील अंकुश चौक येथे हायटेन्शन वीज टॉवरवर चढून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करणाऱ्या व्यक्तीची अखेर फायर ब्रिगेडच्या रेस्क्यू टीमकडून यशस्वी सुटका करण्यात आली. अनेक तास सुरू असलेल्या या थरारक प्रकाराचा शेवट होताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस, अग्निशमन दल तसेच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. संबंधित व्यक्ती खाली उतरायला तयार नसल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. पोलिसांकडून सातत्याने समुपदेशन व संवाद साधत त्याची समजूत काढण्यात आली.
दरम्यान, फायर ब्रिगेडच्या रेस्क्यू टीमने विशेष शिडी (लॅडर) व उपकरणांच्या सहाय्याने टॉवरवर पोहोचत त्या व्यक्तीला सुरक्षित खाली उतरवण्यात यश मिळवले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तो सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्याला वायसीएम रुग्णालय येथे दाखल करण्यात येणार आहे.
या घटनेदरम्यान परिसरात मोठी गर्दी उसळली होती. तसेच भक्ती शक्ती चौक ते त्रिवेणी नगर या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
घटनेमागील कारणांचा तपास पोलीस करीत आहेत.





