अहिल्यानगरगुन्हेगारीग्रामीणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जामखेडमध्ये कुख्यात गुंडावर सात राऊंड गोळीबार; अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीने खळबळ


जामखेडमध्ये कुख्यात गुंडावर सात राऊंड गोळीबार; अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीने खळबळ

जामखेड | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. श्रीरामपूर, घोडेगाव येथे घडलेल्या घटनांनंतर आता जामखेडमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

बुधवारी (दि. ४ मार्च) रात्री जामखेड शहरातील नुरानी कॉलनी परिसरात कुख्यात गुंड पैलवान सागर मोहळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सात राऊंड गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सागर मोहळकर हा नुरानी कॉलनी परिसरात असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर जवळून गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची नाकेबंदी केली.

दरम्यान, या गोळीबारात मोहळकर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात अल्पावधीतच गोळीबाराच्या तीन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, जामखेड पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *