परांड्याच्या सुवर्णकन्या भाग्यश्री फंड-कोळी यांचा आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते विशेष सन्मान

परांड्याच्या सुवर्णकन्या भाग्यश्री फंड-कोळी यांचा आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते विशेष सन्मान
अंडर-२३ आशियाई कुस्ती स्पर्धेतील सुवर्णयशाचा गौरव; ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका
परांडा | प्रतिनिधी
व्हिएतनाम येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित अंडर-२३ आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत भारतासह महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावणाऱ्या ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान भाग्यश्री मंगेश फंड-कोळी यांचा आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
६२ किलो वजन गटात दमदार आणि एकतर्फी कामगिरी करत भाग्यश्रीने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. उपांत्य फेरीत किर्गिस्तानच्या प्रतिस्पर्धी मल्लाचा १२-२ अशा तांत्रिक फरकाने पराभव करत तिने अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम लढतीतही आपल्या आक्रमक खेळ, तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने सुवर्णपदक पटकावून भारताचा तिरंगा उंचावला.
यशानंतर भाग्यश्री यांनी आमदार तानाजी सावंत यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा गौरव केला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “भाग्यश्रीचे यश हे महाराष्ट्रातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी असून मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जागतिक स्तरावर यश मिळवता येते, हे तिने सिद्ध केले आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
मूळची पुणे जिल्ह्यातील असलेल्या भाग्यश्री सध्या हरियाणातील रोहतक येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण घेत आहे. सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी किताब पटकावणाऱ्या या धडाडीच्या महिला पैलवानचे आता लक्ष्य ऑलिम्पिक २०२८ मध्ये भारतासाठी पदक जिंकण्याचे आहे.
परांड्याची आदर्श सून आणि महाराष्ट्राची धाकड कन्या म्हणून ओळख असलेल्या भाग्यश्री फंड-कोळी यांच्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळातही त्या भारताचे नाव जागतिक क्रीडा विश्वात सुवर्णाक्षरांनी कोरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
फोटो कॅप्शन :
अंडर-२३ आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंड-कोळी यांचा आमदार तानाजी सावंत यांनी सत्कार करून गौरव केला.





