कलाताज्या घडामोडीपुणे / पीसीएमसी

जागतिक महिला दिनानिमित्त रुपीनगरमध्ये भव्य महिला हिंदू संमेलन उत्साहात


जागतिक महिला दिनानिमित्त रुपीनगरमध्ये भव्य महिला हिंदू संमेलन उत्साहात

वंदे भारत न्यूज नेटवर्क

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी): जागतिक महिला दिनानिमित्त रुपीनगर येथे भव्य महिला हिंदू संमेलन आणि भारत मातेची महाआरती उत्साहात पार पडली. सोनिगरा मैदान येथे आयोजित या कार्यक्रमात शेकडो महिलांनी पारंपरिक वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सुप्रिया साठे-ठाकूर उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या ओजस्वी भाषणात भारतीय स्त्रियांच्या पराक्रमाचा आणि संस्कारांचा गौरव करत, “स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नसून राष्ट्रनिर्मितीची मुख्य शक्ती आहे,” असा भावनिक संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊंपासून ते स्वातंत्र्यलढ्यातील वीरांगनांपर्यंत स्त्रीशक्तीचा प्रेरणादायी वारसा अधोरेखित करत त्यांनी महिलांनी एकत्र येऊन समाजकार्यात सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.

त्यांनी पुढे सांगितले की, संस्कार, श्रद्धा आणि संघटन यांच्या बळावरच समाज सशक्त होतो. प्रत्येक महिलेमध्ये नेतृत्वगुण दडलेले आहेत; त्या गुणांना वाव देत समाजहितासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या विचारांना प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात सर्व महिलांच्या हस्ते सामूहिक भारत मातेची महाआरती करण्यात आली. त्यानंतर प्रसाद वितरण करण्यात आले. लहान मुलींसाठी राष्ट्रमाता/संस्कृती वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यास चांगला प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाचे आयोजन हिंदू एकता रुपीनगर तळवडे यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमातून स्त्री सन्मान, एकता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *