पुणे-पिंपरी चिंचवडमधील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय*

पुणे-पिंपरी चिंचवडमधील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय
पुणे | प्रतिनिधी
हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केल्यानंतर संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हा प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर तसेच पुणे जिल्हा (ग्रामीण) क्षेत्रातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सोमवारी बंद राहणार आहेत. हवामान खात्याने जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांनाही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदी, नाले, धोकादायक ठिकाणे आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजासाठी सज्ज राहण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातही अतिमुसळधार पावसामुळे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी शाळांना ६ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
– वंदे भारत न्यूज एक्सप्रेस





