कल्याण, डोंबिवली, नवी मुबंई सह रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कल्याण, डोंबिवली, नवी मुबंई सह रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अलिबाग | प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील २४ तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक नद्या व नाले दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
आदेशानुसार, रायगड जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सोमवार, ६ जुलै रोजी सुट्टी राहणार आहे. मात्र, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजासाठी सज्ज राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई तसेच रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.





