ताज्या घडामोडीपुणे / पीसीएमसीशिक्षण

डी. वाय. पाटील बी-स्कूलमधील तब्बल ४.९८ कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालकावर गुन्हा 


डी. वाय. पाटील बी-स्कूलमधील तब्बल ४.९८ कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालकावर गुन्हा

प्रवेश कमिशन, वेतन नोंदी आणि आर्थिक मंजुरीत अनियमिततेचा आरोप; आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू

पुणे | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथील डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूलमध्ये तब्बल ४ कोटी ९८ लाख रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी संस्थेचे माजी संचालक अमोल आनंदराव गावंडे यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) तपासानंतर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युनिटेक सोसायटीच्या खजिनदार डॉ. रोहिणी सोमनाथ पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, अमोल गावंडे यांनी बी-स्कूलचे संचालक तसेच डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद विद्यापीठाचे प्रो-व्हाइस चान्सलर म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या कार्यकाळात प्रवेश प्रक्रिया, प्राध्यापकांचे वेतन, प्रवेश सल्लागारांचे कमिशन, शैक्षणिक सहली आणि आर्थिक मंजुरी यांवर त्यांचे नियंत्रण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

संस्थेमध्ये आर्थिक अनियमिततेची शंका निर्माण झाल्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले. AZB & Partners यांनी केलेल्या लेखापरीक्षणात ऑक्टोबर २०२३ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सुमारे ४.९८ कोटी रुपयांचा कथित अपहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

तपासादरम्यान प्रवेश सल्लागारांना देण्यात येणाऱ्या कमिशनमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. प्रवेश रद्द झालेल्या विद्यार्थ्यांनंतरही कमिशन मंजूर करणे तसेच एकाच विद्यार्थ्यासाठी दुहेरी बिले तयार करून सुमारे १.०८ कोटी रुपयांचे पेमेंट करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

याशिवाय वेतन नोंदींमध्ये फेरफार, संस्थेच्या निधीचा कथित अपहार, डिजिटल पुरावे नष्ट करणे आणि गोपनीय माहितीची बेकायदेशीर प्रत तयार केल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *