ताज्या घडामोडीलातूरवाणिज्य

दीड लाखांचे कर्ज, ५५ लाखांची परतफेड; तरीही जामीनदारावर १ कोटींचा बोजा? लातूरमध्ये अवैध सावकारीविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई सुरू


दीड लाखांचे कर्ज, ५५ लाखांची परतफेड; तरीही जामीनदारावर १ कोटींचा बोजा? लातूरमध्ये अवैध सावकारीविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई सुरू

नणंद प्रकरणानंतर जिल्हा प्रशासन सतर्क; नागरिकांना तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

लातूर | प्रतिनिधी

“दीड लाखांचे कर्ज घेतले, ५५ लाखांहून अधिक रक्कम परतफेड केली, तरीही जामीनदारावर तब्बल १ कोटी रुपयांची देयकाची मागणी” अशा धक्कादायक आरोपांमुळे लातूर जिल्ह्यातील अवैध सावकारी आणि फायनान्स व्यवसाय पुन्हा चर्चेत आला आहे. शेतकरी व सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारींनंतर जिल्हा प्रशासनाने अवैध सावकारांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे.

निलंगा तालुक्यातील नणंद येथे समोर आलेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व्ही. एल. पोतंगले यांनी स्वतः गावाला भेट देऊन संबंधित कुटुंबीयांशी चर्चा केली. या भेटीनंतर निलंगा तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयाला तातडीने कायदेशीर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संबंधित प्रकरणात कर्जदारांकडून जादा व्याज आकारणे, व्याजावर व्याज लावणे, कोरे धनादेश व स्टॅम्प पेपर घेणे, मालमत्तेची कागदपत्रे बळजबरीने लिहून घेणे तसेच कर्ज वसुलीसाठी धमकी व दबाव टाकल्याचे आरोप समोर आले आहेत. अशा प्रकारांमुळे अनेक कुटुंबे आर्थिक आणि मानसिक संकटात सापडल्याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणताही परवानाधारक किंवा बेकायदेशीर सावकार कायद्याच्या विरोधात वर्तन करत असल्यास नागरिकांनी त्वरित तक्रार करावी. तक्रारीसोबत कर्ज व्यवहाराची कागदपत्रे, पावत्या, धनादेश, करारपत्रे, मोबाईल संदेश, ऑडिओ-व्हिडिओ पुरावे सादर करता येतील. सर्व तक्रारींची गोपनीयतेने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

अवैध सावकारीच्या जाळ्यात अडकलेल्या नागरिकांनी भीती न बाळगता पुढे यावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केले आहे.

तक्रार कुठे कराल?

📍 जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय, शिवाजी चौक, लातूर

📞 ०२३८२-२४५१९३

📧 ddr_ltr@rediffmail.com

वंदे भारत न्यूज एक्सप्रेस

“सत्य | निर्भीड | वेगवान”

मुख्य संपादक : औदुंबर पाडुळे

🌐 www.vandebharatnewsexpress.com⁠�


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *