विठुरायाच्या चरणी मुख्यमंत्र्यांचे साकडे; “बळीराजाच्या शिवारात सुखाचा पाऊस बरसू दे, महाराष्ट्र समृद्ध होऊ दे!”
विठ्ठल चरणी मुख्यमंत्र्यांची प्रार्थना; “पाऊस पडू दे, पीक बहरू दे, महाराष्ट्र समृद्ध होऊ दे”
पंढरपूर | प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करून राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी विठ्ठलाच्या चरणी, “बळीराजा सुखी-समाधानी राहू दे, महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडू दे,” अशी मनोभावे प्रार्थना अर्पण केली.
“रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी…” या संतवाणीचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, आषाढी एकादशी हा लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजराचा पवित्र सोहळा आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठूमाऊली आणि रुक्मिणी मातेची महापूजा करण्याचा मान लाभणे ही आयुष्यातील अविस्मरणीय अनुभूती असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

महापूजेनंतर विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करताना मुख्यमंत्री म्हणाले, “पाऊस पडू दे, पीक बहरू दे, पांडुरंगा महाराष्ट्र समृद्ध होऊ दे.” राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन सुखी व्हावे, शेतीला मुबलक पाऊस लाभावा, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद, शांतता आणि समृद्धी नांदावी, अशीही प्रार्थना त्यांनी केली.
यावेळी महाराष्ट्राच्या प्रगतीसह सामाजिक सलोखा, ऐक्य आणि विकास अखंड राहावा, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. लाखो वारकऱ्यांच्या भक्तीमुळे महाराष्ट्राची संतपरंपरा अधिक बळकट होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.





