पुणे / पीसीएमसीमनोरंजनशिक्षण

संतपरंपरेचा संस्कार; शिक्षण प्रसारक मंडळीच्या शाळेत उत्साहात पालखी सोहळा


निगडीतील शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी माध्यम शाळेत भक्तिमय वातावरणात आषाढी वारी पालखी सोहळा
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी माध्यम शाळा, निगडी येथे शुक्रवार (दि. २४ जुलै २०२६) रोजी आषाढी वारीनिमित्त पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या संतपरंपरेची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सविता बिराजदार आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली. “ज्ञानोबा-तुकोबा”च्या जयघोषात आणि श्री विठ्ठल नामस्मरणाने संपूर्ण शाळा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
यावेळी विठ्ठल-रुक्मिणी, संत आणि वारकरी यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी आकर्षक सहभाग नोंदवला. वारकरी पोशाख स्पर्धा, निबंध लेखन, चित्रकला आणि पोस्टर मेकिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच अभंग, ओव्या, गवळण यांचे सादरीकरण करण्यात आले. छोट्या वारकऱ्यांनी फुगड्यांचा आनंद लुटत पालखीची मिरवणूक काढली.


इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी अनुष्का खंडाळे हिने वारकरी गीत सादर केले. संगीत शिक्षिका रमा मिस यांनी पालखीची भक्तिगीते सादर केली, तर शिक्षिका अर्चना जाधव यांनी विद्यार्थ्यांना वारीचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगितले.
शाळा समितीचे अध्यक्ष ॲड. प्रा. डॉ. राघव अष्टेकर यांच्या संकल्पनेतून आणि मुख्याध्यापिका सविता बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा पालखी सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *