शिरूर बायपासवरील अनधिकृत मार्गिकेमुळे दोन बळी; खासदार डॉ. अमोल कोल्हेंची NHAIकडे तातडीच्या कारवाईची मागणी
शिरूर बायपासवरील अनधिकृत मार्गिकेमुळे दोन बळी; खासदार डॉ. अमोल कोल्हेंची NHAIकडे तातडीच्या कारवाईची मागणी
शिरूर | प्रतिनिधी
पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील शिरूर बायपास येथील संग्राम हॉटेलजवळ दुभाजक तोडून तयार करण्यात आलेल्या मार्गिकेमुळे झालेल्या भीषण अपघातात प्रथमेश लाड आणि वाडेगव्हाण येथील लोकनियुक्त सरपंचांचे पती किशोर यादव या दोन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर शिरूर बायपासवरील अनधिकृत कट आणि रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लाड आणि यादव कुटुंबीयांप्रती भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली. तसेच या घटनेला केवळ अपघात न मानता, रस्त्याच्या दुभाजकात नियमबाह्यपणे मार्गिका तयार करण्यात आली असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
डॉ. कोल्हे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सचिन कुमार गौतम यांना १३ ऑगस्ट २०२६ रोजी पत्र पाठविले आहे. संग्राम हॉटेलसमोरील संबंधित मार्गिका NHAIच्या मंजूर आराखड्यानुसार आहे की अनधिकृतपणे तयार करण्यात आली आहे, याची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पडताळणी करावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
सदर मार्गिका अनधिकृत असल्याचे आढळल्यास दुभाजक तोडणाऱ्यांवर तसेच संबंधित बाबीकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, संपूर्ण शिरूर बायपासची पाहणी करून दुभाजकातील सर्व अनधिकृत कट आणि मार्गिका तातडीने बंद कराव्यात. वाहनचालकांसाठी सुरक्षित आणि अधिकृत यू-टर्नची व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचनाही डॉ. कोल्हे यांनी केली आहे.
याशिवाय संपूर्ण बायपासचे तातडीने रोड सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली असून, अपघातांची शक्यता कमी करण्यासाठी आवश्यक ठिकाणी दिशादर्शक व चेतावणी फलक, प्रकाशव्यवस्था, रंबल स्ट्रिप्स आणि क्रॅश बॅरिअर्स बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिरूर बायपासवर अनधिकृत कटमुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्यास प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. दोन नागरिकांच्या मृत्यूनंतर आता संबंधित मार्गिकेची वस्तुस्थिती समोर येऊन जबाबदारी निश्चित होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





