निगडीतील शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी माध्यम शाळेत क्रीडा दिन उत्साहात
निगडीतील शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी माध्यम शाळेत क्रीडा दिन उत्साहात
सिलंबम, गतका, लाठी-काठी, मर्दानी खेळांसह सेल्फ डिफेन्सचे थरारक प्रात्यक्षिक; विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कार रुजविण्याचा संदेश
निगडी : खेळ हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून निरोगी आणि सक्षम जीवनाचा आधार आहे, हा संदेश देत शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी माध्यम शाळा, निगडी येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारताचे महान हॉकीपटू व ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट रोजी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय सिलंबम खेळाडू किरण आढागळे व गणेश गेजगे, शाळा समिती अध्यक्ष ॲड. प्रा. डॉ. राघव अष्टेकर तसेच मुख्याध्यापिका सविता बिराजदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच बलोपासनेचे प्रतीक असलेल्या भगवान हनुमान यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली.
क्रीडा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राची प्रेरणा मिळावी, भारतीय पारंपरिक खेळांची ओळख व्हावी आणि आत्मसंरक्षणाचे महत्त्व समजावे, या उद्देशाने किरण आढागळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध भारतीय क्रीडा प्रकारांचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर केले. यामध्ये सिलंबम, गतका, लाठी-काठी, सेल्फ डिफेन्स, कलेरू पेटू आणि मर्दानी खेळ यांचा समावेश होता. विविध खेळांतील चित्तथरारक कौशल्ये पाहताना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
यावेळी शाळेतील क्रीडा शिक्षिका शीतल महांकाळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा प्रतिज्ञा दिली. विद्यार्थ्यांनी खेळाडूवृत्ती, शिस्त आणि प्रामाणिकपणे खेळण्याचा संकल्प केला.
शाळा समिती अध्यक्ष ॲड. प्रा. डॉ. राघव अष्टेकर यांनी मार्गदर्शन करताना भारतीय पारंपरिक खेळांचे महत्त्व अधोरेखित केले. शारीरिक क्षमता विकसित करण्यासोबतच मानसिक आरोग्य, आत्मविश्वास आणि शिस्त निर्माण करण्यासाठी मैदानी खेळांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा कारकिर्दीची माहिती देत विद्यार्थ्यांना त्यांच्या जिद्द, मेहनत आणि समर्पणातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
भगवान हनुमान यांच्या सामर्थ्याची प्रेरणादायी कथा सांगत अष्टेकर यांनी विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्या सक्षम, मानसिकदृष्ट्या खंबीर आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी नियमित व्यायाम व खेळांची सवय लावण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक शिवाजी बांदल यांनी केले, तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षिका शीतल महांकाळे यांनी केले.
शाळा समिती अध्यक्ष ॲड. प्रा. डॉ. राघव अष्टेकर यांच्या प्रेरणेतून तसेच मुख्याध्यापिका सविता बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला हा क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भारतीय पारंपरिक खेळांच्या प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी उत्सुकता निर्माण झाली असून, ‘खेळा, तंदुरुस्त राहा आणि सक्षम भारत घडवा’ असा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.





