ताज्या घडामोडीपुणे / पीसीएमसीशिक्षण

भक्ती, शिस्त अन् ‘पंच परिवर्तन’चा संदेश; शिक्षण प्रसारक मंडळीच्या निगडी शाळांचा गणरायाला निरोप


शिक्षण प्रसारक मंडळीच्या निगडी शाळांमध्ये भक्ती, शिस्त आणि ‘पंच परिवर्तन’चा अनोखा संगम

निगडी, दि. १५ सप्टेंबर २०२६ :

ढोल-ताशांचा निनाद, लेझीमच्या तालावर थिरकणारी पावले, पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने यमुनानगर परिसर दुमदुमून गेला. भक्तीच्या वातावरणाला राष्ट्रभक्तीची प्रेरणा, भारतीय संस्कृतीला संस्कारांची जोड आणि उत्सवाला सामाजिक परिवर्तनाचा विचार देत शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी व इंग्रजी माध्यम शाळा, निगडीचा गणेशोत्सव आगळावेगळा ठरला.

पारंपरिक गणेशोत्सवाच्या चौकटीपलीकडे जात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला, सामाजिक जाणीवेला आणि राष्ट्रप्रेमाच्या संस्कारांना प्राधान्य देणारे विविध उपक्रम यावेळी राबविण्यात आले. ‘वंद्य वन्दे मातरम्’ या संकल्पनेवर साकारलेला देखावा आणि त्यातून देण्यात आलेला ‘पंच परिवर्तन’चा संदेश हे यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.

वंद्य वन्दे मातरम्’मधून राष्ट्रभक्तीचा जागर

दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता इयत्ता दहावीतील अग्रणी विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेतील श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ धार्मिक परंपरेची ओळख न करून देता राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी, स्वावलंबन आणि सकारात्मक परिवर्तनाची दिशा देण्याचा प्रयत्न शाळेने केला.

यावेळी मुख्याध्यापिका सविता बिराजदार, अम्रिता कर्नेल, लीना वर्तक, शाळा समिती अध्यक्ष ॲड. प्रा. डॉ. राघव अष्टेकर, नवीन नायडू, नगरसेवक उत्तमजी केंदळे, बापूशेठ घोलप यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना जाधव यांनी केले.

शिस्तबद्ध मिरवणुकीने निगडीचा परिसर दुमदुमला

दि. १५ सप्टेंबर रोजी गणेशाची महाआरती झाल्यानंतर भव्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यंदाच्या शैक्षणिक वर्षात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या विविध विद्यार्थी पथकांनी मिरवणुकीत विशेष रंग भरला.

बरची पथक, लाठी-काठी पथक, ढोल-ताशा पथक, लेझीम पथक, आर.एस.पी. पथक, कब-बुलबुल पथक, घोष पथक आणि गीत मंच अशा विविध पथकांनी शिस्तबद्ध संचलन करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि विविध वाद्यांच्या तालाने संपूर्ण परिसर भक्तिमय आणि राष्ट्रप्रेमाच्या वातावरणाने भारावून गेला.

फुलांनी सजविलेल्या आकर्षक गणेशरथाने मिरवणुकीचे सौंदर्य अधिक खुलविले. शाळेपासून सुरू झालेली मिरवणूक यमुनानगर परिसरातून मार्गक्रमण करत असताना नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

परंपरेला आधुनिक सामाजिक विचारांची जोड

गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्यांची रुजवणूक करण्याबरोबरच सामाजिक प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची दृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘पंच परिवर्तन’च्या विचारातून व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी सकारात्मक बदलाची गरज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली.

राष्ट्रभक्ती ही केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता ती दैनंदिन आचरणातून दिसून यावी, सामाजिक जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण व्हावी आणि देशाच्या प्रगतीत आपले योगदान देण्याची भावना त्यांच्या मनात रुजावी, हा या उपक्रमामागील व्यापक विचार होता.

‘उत्सव’ नव्हे, विद्यार्थ्यांसाठी मूल्यशिक्षणाचा अनुभव

शाळेतील गणेशोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा अनुभव ठरला. विविध पथकांमध्ये सहभागी होताना विद्यार्थ्यांनी शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, वेळेचे नियोजन आणि जबाबदारीची जाणीव प्रत्यक्ष अनुभवली.

 

ढोल-ताशा, लेझीम, घोष पथक, आर.एस.पी. यांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि शारीरिक क्षमतेला वाव मिळाला. त्याचवेळी ‘वंद्य वन्दे मातरम्’ आणि ‘पंच परिवर्तन’च्या माध्यमातून त्यांच्या विचारविश्वाला राष्ट्रभक्ती आणि सामाजिक जाणीवेची दिशा देण्यात आली.

पर्यावरणपूरक विसर्जनाचा आदर्श

पर्यावरण संवर्धनाचा संदेशही गणेशोत्सवातून देण्यात आला. गणेशमूर्तीचे विसर्जन शाळेच्या परिसरातच तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक विसर्जन टाकीत करण्यात आले. त्यामुळे पारंपरिक श्रद्धा जपत पर्यावरणाची काळजी घेण्याचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आला.

मिरवणुकीदरम्यान निगडी पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाने सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडला. विसर्जनानंतर उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

शिक्षण प्रसारक मंडळीच्या निगडी शाळांनी यंदाच्या गणेशोत्सवातून भक्तीला संस्कारांची, परंपरेला आधुनिक विचारांची, तर उत्सवाला राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीची जोड देत शिक्षणाचा व्यापक अर्थ अधोरेखित केला. विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, शिस्त, स्वावलंबन आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण करणारा हा गणेशोत्सव शाळेच्या संस्कारक्षम शिक्षणपद्धतीची वेगळी ओळख ठरला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *