महिंद्रा समूहाची महाराष्ट्रात ₹१५ हजार कोटींची गुंतवणूक
महिंद्रा समूहाची महाराष्ट्रात ₹१५ हजार कोटींची गुंतवणूक
१५ हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती होणार
मुंबई : महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण करार आज करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांच्यात विविध प्रमुख क्षेत्रांमध्ये नवीन ग्रीनफिल्ड उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या कराराअंतर्गत महिंद्रा समूहाकडून एकूण ₹१५,००० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून, यामधून १५,००० पेक्षा अधिक थेट व अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
या ग्रीनफिल्ड प्रकल्पांमध्ये
ICE आणि EV प्रवासी वाहने,
हलकी, मध्यम व अवजड व्यावसायिक वाहने,
ट्रॅक्टर व शेतीची यंत्रसामग्री,
महिंद्रा ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज लिमिटेडची उत्पादने,
तसेच कॅप्टिव्ह सप्लायर पार्क यांचा समावेश असणार आहे.
हे प्रकल्प एमआयडीसी बुटीबोरी (नागपूर), एमआयडीसी आडवण (इगतपुरी) आणि छत्रपती संभाजीनगर येथे विकसित करण्यात येणार आहेत. यामुळे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातील औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.
या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (ऑटो व फार्म सेक्टर) राजेश जेजुरीकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कराराचे स्वागत करताना सांगितले की, “महाराष्ट्र हे उद्योगांसाठी सर्वोत्तम राज्य असून, अशा गुंतवणुकीमुळे राज्यातील तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील आणि ‘मेक इन महाराष्ट्र’ संकल्पनेला बळ मिळेल.”




