ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशिक्षण

एका क्लिक वर कॉपीबहार पकडणार सीसीटीव्हीवर कलेक्टरचा ‘वॉच’; सर्व शाळांना केंद्रीय रेकॉर्डिंगची माहिती देण्याच्या सूचना


एका क्लिक वर कॉपीबहार पकडणार

सीसीटीव्हीवर कलेक्टरचा ‘वॉच’; सर्व शाळांना केंद्रीय रेकॉर्डिंगची माहिती देण्याच्या सूचना

वंदे भारत न्यूज एक्सप्रेस नेटवर्क

मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त व्हाव्यात, यासाठी शिक्षण विभागाने कडक पावले उचलली आहेत. परीक्षा केंद्रांवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आता एका क्षणाचाही विलंब न होता कॉपीबहार पकडणे शक्य होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून थेट सीसीटीव्ही फुटेजवर ‘वॉच’ ठेवण्यात येणार असून, सर्व शाळांना केंद्रीय रेकॉर्डिंग संदर्भातील माहिती देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

दहावी-बारावी परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक वर्गातील सीसीटीव्ही कॅमेरे जिल्हा नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार असून, संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. कॉपीबहार रोखण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत प्रभावी ठरणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई शहर व उपनगरातील एकूण ४३३ परीक्षा केंद्रे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रण कक्षाशी जोडली जाणार आहेत. यामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून, गैरप्रकारांवर आळा बसणार आहे. सीसीटीव्हीचे डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डिंग जतन केले जाणार असून, गरज पडल्यास त्याचा पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे.

शिक्षण निरीक्षक वैशाली वीर यांनी सांगितले की, “जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सीसीटीव्हीविषयक माहिती संकलन प्रक्रिया सुरू आहे. कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे.”

दरम्यान, डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डिंगमुळे परीक्षा प्रक्रियेतील प्रत्येक हालचाल स्पष्टपणे दिसणार आहे. हे रेकॉर्डिंग संगणक किंवा मोबाईलवरही पाहता येणार असल्याने निरीक्षण अधिक प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे परीक्षा काळात कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना वाव राहणार नाही, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *