तासगाव–कवठेमहांकाळ एमआयडीसीला मोठी झेप; ₹१,१०० कोटींच्या गुंतवणुकीचे स्वारस्य पत्र सादर
तासगाव–कवठेमहांकाळ एमआयडीसीला मोठी झेप; ₹१,१०० कोटींच्या गुंतवणुकीचे स्वारस्य पत्र सादर
मुख्यमंत्र्यांची संपूर्ण सहकार्याची ग्वाही; अमेरिका-जपान गुंतवणूकदारांशी जोडण्यासाठी पुढाकार

तासगाव | प्रतिनिधी
तासगाव–कवठेमहांकाळ परिसराच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, एमआयडीसीच्या पर्यावरणपूरक आणि सर्वसमावेशक विकासाला नवी गती मिळाली आहे. दोन नामांकित कंपन्यांनी सुमारे ₹१,१०० कोटींच्या गुंतवणुकीसाठी स्वारस्य पत्रे (एलओआय) सादर केल्याने परिसरातील औद्योगिक विकासाच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत.
यासंदर्भात झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या वतीने प्रकल्पाला संपूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली. त्यामुळे एमआयडीसी उभारणीच्या प्रक्रियेला अधिक वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, इंडो-अमेरिका चेंबर ऑफ कॉमर्सचे डॉ. पारीख तसेच जपान इकॉनॉमिक्स अँड ट्रेड कमिटीचे श्री. पुराणिक यांनी तासगाव एमआयडीसीला जागतिक स्तरावर जोडण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. अमेरिका व जपानमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूक संधींचे सादरीकरण आयोजित करून परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शविली.
अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर या प्रकल्पाला नवी दिशा मिळाली असून, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. उद्योगांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत तासगाव–कवठेमहांकाळला औद्योगिक विकासाची नवी ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने हे पाऊल ऐतिहासिक मानले जात आहे.
“ही केवळ एमआयडीसी नसून आबांचे स्वप्न आणि जनतेच्या विकासाचा भक्कम पाया आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





