ताज्या घडामोडीपुणे / पीसीएमसी

रुपीनगर मुख्य रस्त्यावर भंगार गोदामाला भीषण आग; खासगी बस जळून खाक


रुपीनगर मुख्य रस्त्यावर भंगार गोदामाला भीषण आग; खासगी बस जळून खाक

पिंपरी-चिंचवड: शहरातील रुपीनगर मुख्य रस्त्यावरील स्वामी समर्थ मार्केट परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास भंगारच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले असून गोदामाच्या मागील पार्किंगमध्ये उभी असलेली एक खासगी बस आगीत पूर्णतः भस्मसात झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्काळ पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र गोदामात मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य साठवलेले असल्याने आगीचा भडका झपाट्याने वाढला. आगीमुळे धुराचे प्रचंड लोट आकाशात पसरले होते. दूरवरूनही काळा धूर दिसत असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अगीची तीव्रता एवढी मोठी होती की अजून चार अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले.

गोदामाच्या मागील बाजूस मोठे वाहन पार्किंग आहे. आग वाढू नये म्हणून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी इतर वाहने तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवली. मात्र गोदामालगत उभी असलेली एक खासगी बस आगीच्या विळख्यात सापडून पूर्णपणे जळून खाक झाली.

घटनास्थळी चिखली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी परिसरात बंदोबस्त ठेवत नागरिकांना सुरक्षित अंतरावर राहण्याचे आवाहन केले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ स्वामी समर्थ मार्केट परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *