आरएमसी ट्रकच्या चाकाखाली चिरडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; चिंचवडमध्ये संतापाची लाट
आरएमसी ट्रकच्या चाकाखाली चिरडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; चिंचवडमध्ये संतापाची लाट
वदे भारत न्यूज एक्सप्रेस
पिंपरी-चिंचवड शहरात भरधाव वेगातील आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) ट्रकच्या चाकाखाली चिरडून एका १४ वर्षीय निष्पाप अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही दुर्घटना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर घडल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या अपघातात फारूक तांबोळी (वय १४) या मुलाचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शिव मल्हार रेडीमिक्स कंपनीचा आरएमसी ट्रक भरधाव वेगात जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला.
अपघातानंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी संबंधित आरएमसी ट्रकवर दगडफेक करत वाहनाची तोडफोड केली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले.
या संदर्भात चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता चासकर यांनी सांगितले की, अपघातास कारणीभूत ठरलेल्या आरएमसी टँकर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, शहरात अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याने प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.





