अपघातताज्या घडामोडीपुणे / पीसीएमसी

मोराची चिंचोलीतील वॉटरपार्कमध्ये भीषण अपघात; स्लाइडवरून पडल्याने महिलेचे अर्धे शरीर निकामी


मोराची चिंचोलीतील वॉटरपार्कमध्ये भीषण अपघात; स्लाइडवरून पडल्याने महिलेचे अर्धे शरीर निकामी

पाण्याची पातळी कमी असल्याने दुर्घटना; व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल

वंदे भारत न्यूज एक्सप्रेस | पुणे (प्रतिनिधी)
पुणे जिल्ह्यातील मोराची चिंचोली येथे असलेल्या जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रातील वॉटरपार्कमध्ये निष्काळजीपणामुळे गंभीर अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वॉटर स्लाइडवरून घसरताना झालेल्या अपघातात सहलीसाठी आलेल्या एका महिलेचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाले आहे.
अश्विनी संदीप नप्ते (वय ३७, रा. करंदी) या आपल्या कुटुंबीयांसोबत वॉटरपार्कमध्ये गेल्या होत्या. वॉटर स्लाइडवरून घसरताना स्लाइडच्या शेवटी पाण्याची पातळी अत्यंत कमी असल्याने त्या जोरात खाली आपटल्या. या धडकेत त्या जागीच बेशुद्ध पडल्या.
घटनेनंतर वॉटरपार्कमध्ये तातडीची वैद्यकीय सुविधा अथवा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यामुळे नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिकेच्या साहाय्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत त्यांच्या पाठीचे चार मणके तुटल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या गंभीर दुखापतीमुळे त्यांचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाले आहे.
या प्रकरणी महिलेचे नातेवाईक किरण नप्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरुर पोलीस ठाण्यात वॉटरपार्कचे मालक व व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पर्यटनस्थळांवरील सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पर्यटकांच्या जीविताशी खेळणाऱ्या निष्काळजीपणाविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *