मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक बोगद्यात भीषण अपघात; पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील प्रसिद्ध तरुण उद्योजकाचा जागीच मृत्यू
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक बोगद्यात भीषण अपघात; पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील प्रसिद्ध तरुण उद्योजकाचा जागीच मृत्य
लोणावळा | प्रतिनिधी
मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक (कनेक्टिंग लिंक) बोगद्यात शुक्रवारी मध्यरात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील युवा नेते व उद्योजक तुषार भूमकर यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत कारमधील आणखी तीन ते चार जण जखमी झाले असून, त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या फॉर्च्युनर कारने समोरील मालवाहू वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की फॉर्च्युनरचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर जखमींना तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या एका व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, बचाव पथक आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. तुषार भूमकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

या अपघातामुळे मिसिंग लिंक बोगद्यात काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. सुरक्षेच्या कारणास्तव काही वेळ वाहतूक रोखण्यात आली होती. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
तुषार भूमकर हे वाकड परिसरातील सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या पत्नीने यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून महापालिका निवडणूक लढवली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे वाकड परिसरासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास महामार्ग पोलीस करत असून वाहनाचा वेग, चालकाचे नियंत्रण आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी सुरू आहे.





