पै.अनिकेत घुले यांच्या पुढाकारातून ‘एक लाख युवक’ घडविण्याचा संकल्प! औंधमध्ये युवक नेतृत्व विकास शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
युवक घडतील, महाराष्ट्र घडेल!
औंधमध्ये युवक नेतृत्व विकास शिबिर; गुणवंतांचा गौरव, वृक्षारोपण अन् गरजू विद्यार्थ्यांना सायकली
औंध, सातारा : युवकांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक विचारांची रुजवणूक करून सक्षम पिढी घडविण्याच्या उद्देशाने औंध येथे युवक नेतृत्व विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिवभक्त प्रतिष्ठानचे संस्थापक शिवभक्त अनिकेत भाऊ घुले मित्र परिवार यांच्या पुढाकाराने आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.

शिबिरात युवकांना व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वक्षमता, सकारात्मक दृष्टिकोन आणि सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणासोबतच समाजोपयोगी विविध उपक्रम राबवून युवकशक्तीला विधायक दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या वेळी परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले.
शिक्षणाची जिद्द असलेल्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लागावा, या उद्देशाने मुला-मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे सुलभ होणार आहे.

युवक घडविणे, गुणवंतांचा गौरव करणे, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत करणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे, या चारही सामाजिक मूल्यांचा सुंदर संगम या उपक्रमातून साधण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवक नेतृत्व विकास प्रशिक्षणाचे प्रमुख प्रशिक्षक बिपिन भैया घाडगे, विक्रम भैया भोसले, शुभमजी इंगळे आणि आकाशजी मांढवे तसेच शिवभक्त प्रतिष्ठान व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योद्धा करिअर अकादमीच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
“एका शिबिरातून काही युवक घडतील; मात्र एका संकल्पातून संपूर्ण पिढी घडू शकते,” या विचारातून प्रेरणा घेत एक लाख युवक घडविण्याचा संकल्प आणि उज्ज्वल महाराष्ट्राचा ध्यास या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आला.





