ताज्या घडामोडीपुणे / पीसीएमसीमहाराष्ट्र

देहूत संत तुकाराम महाराज बीज सोहळा; पालखी, कीर्तन व महापूजेचे आयोजन


देहूत संत तुकाराम महाराज बीज सोहळा; पालखी, कीर्तन व महापूजेचे आयोजन

देहू, दि. ५ मार्च २०२६ (गुरुवार)

जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यानिमित्त देहू नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फाल्गुन कृ. द्वितीया (बीज) निमित्त होणारा हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

पहाटे ३ वाजता काकडा आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. पहाटे ४ वाजता अध्यक्ष व विश्वस्त यांच्या हस्ते श्रींची महापूजा तसेच शिळा मंदिरात महापूजा पार पडेल. सकाळी ६ वाजता वैकुंठगमन स्थानी श्री संत तुकाराम महाराजांची महापूजा होणार आहे.

सकाळी १० ते १२ या वेळेत वैकुंठगमन प्रसंगावर ह.भ.प. देहूकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता मुख्य मंदिरातून श्रींची पालखी वैकुंठगमन स्थळ (गोपालपुरा) येथे प्रस्थान करेल. दुपारी १२.३० वाजता पालखीचे वैकुंठगमन मंदिराकडून मुख्य मंदिरात आगमन होणार आहे.

या सोहळ्याचे आयोजन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू यांच्या वतीने करण्यात आले असून हजारो भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. प्रशासनानेही भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था केली आहे.

संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यानिमित्त देहू नगरीत अभंग, नामस्मरण आणि भक्तीमय वातावरणाची अनुभूती भाविकांना मिळणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *