ताज्या घडामोडीपुणे / पीसीएमसी

धक्कादायक! वडिलांनी मोबाईल तपासल्याने मुलीचे टोकाचे पाऊल


धक्कादायक! वडिलांनी मोबाईल तपासल्याने मुलीचे टोकाचे पाऊल

जाधववाडी (चिखली) येथील हृदयद्रावक घटना; पालक-पाल्य संवादाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पिंपरी, वंदे भारत न्यूज एक्सप्रेस :

जाधववाडी, चिखली परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहराला हादरवून सोडले आहे. मोबाईल तपासल्याच्या मानसिक धक्क्यातून आठवीत शिक्षण घेणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे पालक आणि मुलांमधील संवादाच्या नात्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मृत विद्यार्थिनी प्रतीक्षा अनिल गायकवाड (वय १६, रा. जाधववाडी, चिखली) ही महापालिकेच्या स्थानिक शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती. ती अभ्यासात चांगली व स्वभावाने शांत होती, अशी माहिती शाळेतील शिक्षकांनी दिली. तिच्या अकाली जाण्याने कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि शिक्षकवर्गावर शोककळा पसरली आहे.

चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १७) तिचे वडील अनिल गायकवाड यांनी तिचा मोबाईल अचानक तपासला. त्यांनी यावेळी कोणताही राग व्यक्त केला नव्हता किंवा मुलीला ओरडले नव्हते. मात्र, ही बाब मनाला लावून घेतल्याने प्रतीक्षा नैराश्यात गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

त्याच दिवशी रात्री सुमारे नऊच्या सुमारास तिने घरातच विषारी औषध प्राशन केले. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. काही दिवस उपचार सुरू होते; मात्र शनिवारी (दि. २१) रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी पालक-पाल्य संवाद अधिक संवेदनशील आणि विश्वासार्ह असावा, अशी भावना व्यक्त केली आहे. डिजिटल युगात मोबाईल हे मुलांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहे. त्यामुळे नियंत्रणाबरोबरच समजूत, विश्वास आणि मोकळेपणाची गरज अधिक अधोरेखित होत आहे.

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, किशोरवयीन मुलांमध्ये भावनिक चढउतार तीव्र असतात. छोट्या वाटणाऱ्या गोष्टी त्यांच्यासाठी मोठा मानसिक धक्का ठरू शकतात. अशा वेळी रागावण्यापेक्षा संवाद साधणे, त्यांची बाजू ऐकून घेणे आणि विश्वासाचे नाते जपणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी आहे. पालकांनी मुलांशी सतत संवाद ठेवत त्यांचे मानसिक स्वास्थ्य जपणे ही काळाची गरज असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *