ज्ञानदीप विद्यालयात ‘अभिनव पालखी सोहळा’ उत्साहात; संत संस्कृतीचे संस्कार विद्यार्थ्यांवर
ज्ञानदीप विद्यालयात ‘अभिनव पालखी सोहळा’ उत्साहात; संत संस्कृतीचे संस्कार विद्यार्थ्यांवर
पिंपरी : रूपीनगर येथील ज्ञानदीप विद्यालयामध्ये बुधवार (दि. २२ जुलै) रोजी बालवाडी विभागाच्या वतीने ‘अभिनव पालखी सोहळ्याचे’ आयोजन उत्साहात करण्यात आले. या उपक्रमात सुमारे २६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पारंपरिक वेशभूषा, अभंग, भजन आणि पालखी मिरवणुकीतून वारकरी परंपरेचा अनुभव घेतला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, जनाबाई, मुक्ताबाई आदी संतांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. फुलांनी सजविलेल्या पालखीची मिरवणूक, टाळ-मृदंगाचा गजर, अभंग व भजन यामुळे विद्यालय परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
विद्यार्थ्यांमध्ये संतपरंपरेबद्दल आदर निर्माण व्हावा, भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी आणि पारंपरिक मूल्यांचे जतन व्हावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रूपीनगर येथील मारुती मंदिरातील भजनी मंडळ तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अभंग-भजन सादर करण्यात आले आणि सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या वेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून, विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेची ओळख करून देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या पसंतीस उतरला.





